नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सोन्याच्या किमतीत वाढ होत असतानाच विद्यमान आर्थकस वर्षांमध्ये दागिन्यांची विक्री मूल्याच्या दृष्टीने १० ते १२ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा इक्रा पतमानांकन संस्थेने आपल्या एका अहवालामध्ये व्यक्त केली आहे. देशांतर्गत दागिन्यांच्या विक्रीतील मूल्य वाढीचा अंदाज आधीच्या ८ ते १० टक्क्यांवरून १०-१२ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. सोन्याच्या किमतीत वाढ झाल्यामुळे हा अंदाज वाढवण्यात आल्याचे इक्राने म्हटले आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत दागिन्यांची विक्री वार्षिक आधारावर १५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढण्याची अपेक्षा आहे. अक्षय्य तृतीयेदरम्यान सोन्याची सतत मागणी आणि चढेभाव यामुळे ही वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. परंतु महागाई वाढल्यामुळे ग्रामीण मागणी परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विद्यमान आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत सोन्याच्या किमती तुलनेने स्थिर होत्या. पण आधीच्या वर्षात याच कालावधीतील सरासरी किमतीपेक्षा १४ टक्के जास्त होत्या, असे अहवालात म्हटले आहे. स्थिर मागणीमुळे चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत ज्वेलरी उद्योगाची वार्षिक आधारावर ६-८ टक्क्यांनी वाढ होईल, असा अंदाजही त्यात आहे. पतमानांकन एजन्सीने म्हटले आहे की, खंडांमध्ये मंदगतीने वाट झाली असली, तरी किरकोळ दागिन्यांच्या किमती वाढल्याने त्यांची कमाई वाढली आहे.