यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील किनगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये हाणामारी झाली. यात दोन जण जखमी झाले. याप्रकरणी दोन्ही गटाकडून फिर्याद दिल्यावरुन यावल पोलिस ठाण्यात १८ जणाविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केवळ धक्का लागल्याने किनगाव येथे ग्रामपंचायत समोर दोन गटांमध्ये वाद झाला. याचे पर्यावसन हाणामारी व दंगलीत घडले. यात लोखंडी कडे, फायटर याचा वापर करण्यात आला. सागर सपकाळे (२१), उखा जाधव (५०) दोन जखमी झाले आहेत. सागर सपकाळे यास यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याप्रकरणी जखमी सागर बापू सपकाळे याच्या फिर्यादीवरून सात जणाविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या गटाकडून उखा रामलाल जाधव यांच्या फिर्यादीवरून ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे.