जळगाव : प्रतिनिधी
वडील आणि मुलगा हे सुरत येथून आपल्या बुलेटवर जामनेर देवपिंप्री सख्ख्या गावी चुलत भावाकडे गृहप्रवेश कार्यक्रमासाठी जात असताना पारोळा तालुक्यातील कडजी शिवारातील उड्डाणपुलावर बुलेटला अपघात झाला. या अपघातात मुलगा ठार तर वडील गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ७:३० वाजेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर सूरतहून बुलेटवर (जीजे०५/एनटी५२२६) चालक रोहन भोई व श्रावण भोई येत असताना कडजी शिवारातील उड्डाणपुलावर अपघात झाला. हे दोघेही त्याठिकाणी गंभीर जखमी अवस्थेत पडलेले दिसले. त्यांच्या डोक्यास, चेहन्यावर व हातापायांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांना रुग्णवाहिकाचालक ईश्वर ठाकूर व सहकाऱ्यांनी पारोळा कुटीर रुग्णालयात आणले असता, डॉक्टरांनी तपासणी करून बुलेटचालक रोहन श्रावण भोई (२२, सुरत) यांना मयत घोषित केले. बुलेटमागे बसलेले श्रावण भोई (सुरत) हे गंभीर जखमी झाले.
त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे रवाना करण्यात आले आहे. याबाबत पारोळा पोलिसात विकास पाटील (कडजी, ता. पारोळा) यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, देवपिंप्री, ता. जामनेर येथे दि. २२ रोजी मयताचे सख्खे चुलतभाऊ यांच्याकडे घर भरणीचा कार्यक्रम असल्याने त्या कार्यक्रमासाठी सुरत येथून बापलेक रात्री बुलेटने निघाले होते.