मुंबई : वृत्तसंस्था
देशात येत्या काही दिवसावर थर्टी फर्स्टसाठी खास कुरियरने मागवलेल्या विदेशी मद्याचा १ कोटी किंमतीचा साठा राज्य उत्पादन शुल्क, मुंबई शहर भरारी पथक दोन यांनी केलेल्या कारवाईत जप्त करण्यात आला आहे. तसेच तीन आरोपींवर गुन्हा नोंदविण्यात आला असून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले टेम्पो आणि कंटेनर सुद्धा जप्त करण्यात आले आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई शहर भरारी पथक दोनचे निरीक्षक प्रकाश काळे यांच्या नेतृत्वाखाली दाणा आणि वाडीबंदर येथे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत हरियाणा राज्यात विक्री केल्या जाणाऱ्या विदेशी मद्याच्या ५८० ब्रँड व्हिस्की बॉटल कुरिअरच्या माध्यमातून अवैद्य वाहतूक करून मुंबईत आणण्यात आल्याची खबर मुंबई शहर भरारी पथक दोनला मिळाली होती.
त्यानुसार कारवाई करून उत्पादन शुल्क विभागाने सदर गुन्ह्यात नरेश रवानी, जीशान कुरेशी आणि प्रेमजी गाला या तीन आरोपींवर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे एक कंटेनर आणि टेम्पो असे वाहन सापडले असून १७ नामवंत विदेशी ब्रँड कंपनीच्या ५८० सीलबंद बाटल्या सापडल्या आहेत. या सर्व कारवाईत १ कोटी १ लाख ६३ हजार ९३५ कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाई पथकामध्ये निरीक्षक प्रकाश गौडा, संतोष चोपडेकर, संदीप मोरे, दुय्यम निरीक्षक प्रताप खरबे, रफिक शेख जवान विनोद अहिरे सचिन पैठणकर प्रथम रावराणे विकास सावंत आणि सानप दिनेश खैरनार सहभागी झाले होते.