यवतमाळ : वृत्तसंस्था
प्रत्येक पती व पत्नीच्या नात्यात विश्वास खूप महत्वाचा असतो. पती-पत्नीचं नातं तर संपूर्णपणे प्रेम आणि विश्वासावर चालतं. मात्र एकाचाही दुसऱ्यावरचा विश्वास कमी झाला तर सगळंच बिघडू शकतं. आणि या नात्यात एकदा संशयाचा किडा घुसला की मग संसार उद्ध्वस्त होऊ शकतो. अशाच संशयाचा किडा डोक्यात वळवळवल्याने एका पतीने जे कृत्य केलं त्यामुळे त्याचा संसार तर विखुरलाच पण बाकीच्यांचही आयुष्य नासलं. हि घटना यवतमाळ जिल्ह्यातून समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील तिरझडा गावात मंगळवारी रात्री ११ वाजता पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत एका नराधम पतीने सासरवाडीत पत्नीसह जाऊन चौघांची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. आरोपीने त्याची पत्नी, सासरा आणि त्याच्या दोन मेव्हण्यांची निर्घृणपणे हत्या केली. कौटुंबिक वादातून एकाच कुटुंबातील चौघांची हत्या झाल्याने आजूबाजूच्या परिसरात अक्षरश: दहशतीचं वातावरण आहे. आरोपी जावई विरचंद पवार याला कळंब पोलीसांनी बेड्या ठोकत अटक केली.