एरंडोल : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यात दोन दिवसापासून अपघाताची मालिका सुरु असतांना नुकतेच एरंडोल तालुक्यात देखील एक भीषण अपघात घडल्याचे समोर आले आहे. तालुक्यातील अंतुर्ली खुर्द शिवारातील आयटीआय कॉलेजजवळ दोन दुचाकींमध्ये समारोसमोर झालेल्या धडकेत दोन्ही दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेत उत्राण व निपाणे येथील तरुणांचा मृत्यू झाला असून यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्राण येथील अमोल मांगीलाल भोई उर्फ गोलू (वय २२) हा मंगळवारी दुचाकी (एमएच – १९, डीई- ४०५८) ने कासोदा येथील बाजारात पेरु विक्रीसाठी गेला होता. बाजारात पेरु विक्री केल्यानंतर अमोल भोई हा दुचाकीने उत्राणकडे परत निघाला. याच वेळी निपाणे येथील रहिवासी वासुदेव गोरख पाटील हा दुचाकी (एमएच- १९, डिके ६०८७) ने निपाण्याकडून कासोदा गावाकडे जात होता. या दोन्ही दुचाकींची अंतुर्ली खुर्द शिवारातील आयटीआय कॉलेजजवळ समोरासमोर जबर धडक झाली. या दुर्दैवी अपघातात दोघांचाही मृत्यू झाला. तर यातील एका दुचाकीवर बसलेली अंतुर्ली येथील महिला जखमी व बेशुद्ध अवस्थेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही महिला अंतुर्ली येथून बाजारात जाण्यासाठी दुचाकीवर बसल्याचे सांगण्यात आले. या तिघांना सरकारी गाडीने एरंडोलच्या शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून अमोल भोई व वासुदेव पाटील यांना मृत घोषीत केले. तर जखमी महिलेवर एरंडोल येथे उपचार सुरु आहेत. याबाबत कासोदा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या घटनेबाबत नोंद करण्याचे काम सुरू होते. या घटनेचा तपास सपोनी योगिता नारखेडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार रवींद्र पाटील करत असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, उत्रान येथील मांगो नथू भोई यांचा अमोल भोई हा घरातील कर्ता व मोठा मुलगा होता. आई, वडील आपल्या मुलाचे लग्न व्हावे म्हणून स्वप्न पाहत होते आणि आज काळाने त्याच्यावर झडप घातली. दुपारी ४ वाजता गावात या घटनेची माहिती मिळताच त्याच्या मित्रांनी व नातेवाईकांनी हॉस्पिटल गाठले. या घटनेमुळे संपूर्ण गावात एकही चुल पेटली नव्हती.