चोपडा : प्रतिनिधी
जळगाव येथून चोपडा येथे प्रांताधिकारी एकनाथ दत्तात्रय भंगाळे हे त्यांचे खासगी वाहन (एम.एच.२०-एफ.वाय, ०२१६) चालवत असताना रस्त्यात अवैध वाळू नेणारे ट्रॅक्टर रोखण्याचा प्रयत्न त्यांनी केला, यावेळी ट्रॅक्टर चालकाने थेट त्यांच्या कारला धडक दिली. या धडकेत प्रांत भंगाळे हे जखमी झाले. ही खळबळजनक घटना दि. १९ दुपारी खडगावजवळ घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातून बैठक आटोपून दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान प्रांताधिकारी भंगाळे हे पत्नी आणि मुलीसह चोपडा येथे परत येत असताना खडगाव येथे एक ट्रॅक्टर अवैध वाळू नेताना आढळला. त्यांनी खडगाव येथील तलाठी गुलाबसिंग वाहऱ्या पावरा यांना ही माहिती कळविली. यानुसार या ट्रॅक्टरचा तलाठी पावरा यांनी पाठलाग केला. तलाठी पावरा यांनी ट्रॅक्टर चालकास ट्रॅक्टर थांबविण्यास सांगितले असतानाही ट्रॅक्टर चालक राजेश निकास मालते याने टॅक्टर थांबवला नाही. उलट तलाठी गुलाबसिंग पावरा यांना शिवीगाळ करून ‘तू साइडला झाला नाही तर तुला उडवून देईन’ अशी धमकी दिली.
यादरम्यान प्रांताधिकारी भंगाळे यांनी त्यांच्या कारचा वेग वाढवून या ट्रॅक्टरला ओव्हरटेक केले. तसेच तलाठी पावरा यांनीही ट्रॅक्टरला ओव्हरटेक केले आणि ट्रॅक्टरच्या पुढे मोटरसायकल उभी केली. तर भंगाळे यांनीही त्यांची खासगी कार ट्रॅक्टर पुढे उभी केली. यावेळी अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर चालक राजेश विकास मालवे (वय२३, रा. खरग, ता. चोपडा) याने कारला धडक दिली. त्यात प्रांताधिकारी भंगाळे हे बालंबाल बचावले. या धडकेमुळे प्रांताधिकाऱ्यांच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे, तर वाहनाचे प्रचंड नुकसान झाले आहे. एका आरोपीस चोपडा ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक शेषराव नितनवरे करीत आहेत. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल होण्याचे काम सरू होते