चाळीसगाव : प्रतिनिधी
शहरातील एका परिसरातील शाळेत गेलेले दोघे भाऊ शाळा सुटल्यानंतर घरी परतलेच नाहीत. या दोघांना अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसांत सोमवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून, पोलिस संशयिताचा शोध घेत आहेत. हि घटना दि.१३ डिसेंबर रोजी घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रुद्र किरण सोनवणे (६) व आर्यन किरण सोनवणे (११) अशी बेपत्ता झालेल्या मुलांची नावे आहेत. किरण भावलाल सोनवणे (मिलिंदनगर, चाळीसगाव) हे दि. १३ रोजी भुसावळ येथे ऊसतोडणीसाठी गेले होते. दोन्ही मुले रुद्र व आर्यन हे सकाळी त्यांच्या धुळे रोडवरील प्राथमिक विद्यालयात गेली होती. सायंकाळी ती घरी आलीच नाहीत, असे वडिलांना त्यांच्या बहिणीने फोन करून सांगितले. त्यानंतर शोधाशोध करूनही ती सापडले नाहीत. वडील किरण सोनवणे यांनी चाळीसगाव शहर पोलिसांत मुलगा रुद्र व आर्यन यांना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद दिली आहे. अज्ञात व्यक्तीविरोधात भादंवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.