सांगली : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून देशातील बदलत्या हवामानामुळे शेतकरी चांगलेच चिंतेत आले आहे. काही शेतकर्यांनी आपल्या शेतात नागर चालविले आहे तर काही शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास दूर झाल्याने शेतकरी चिंतेत आहे तर सांगली येथे दुष्काळी परस्थितीत टँकरने पाणी आणून जगावलेल्या आणि हातातोंडाशी आलेल्या द्राक्षबागा आता शेतकऱ्यांना स्वतःच्याच हाताने उध्वस्त करण्याची वेळ आली आहे. द्राक्षांचे आगार असणाऱ्या तासगाव तालुक्यातल्या लोकरेवाडी येथे जवळपास १५ ते २० शेतकऱ्यांनी सामूहिकपणे द्राक्ष बागांवर कुऱ्हाड चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे सांगली जिल्ह्यातल्या द्राक्षबाग शेतीला मोठा फटका बसला आहे. जवळपास १५ ते २० एकर क्षेत्रावरील द्राक्षे काढणीला असताना अवकाळीचा फटका बसल्याने झाडांवरच घडकूज झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मणी फुटल्याने दलालांकडून दर देखील मिळत नाही. याशिवाय उरली-सुरली द्राक्ष काढणीला हजारो रुपये खर्च येत असल्याने अखेर हतबल झालेल्या शेतकऱ्यांकडून द्राक्षबागांवर कुऱ्हाड चालवली जात आहे.
अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आहे. लोकरेवाडीतील जवळपास पाच ते सहा शेतकऱ्यांनी आपल्या ३ ते ४ एकर क्षेत्रावरील द्राक्षबागांवर थेट कुऱ्हाड चालवलेली आहे. अशीच परिस्थिती संपूर्ण गावात देखील निर्माण झाली आहे. त्यामुळे द्राक्षबाग शेतकऱ्यांना सरकारने भरीव मदत द्यावी; अशी मागणी शेतकरयांकडून करण्यात येत आहे.