एरंडोल : प्रतिनिधी
एरंडोलकडून भडगावकडे जाणाऱ्या दुचाकीला समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने कट मारला. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेला अरुण काळू मराठे (३९, वेल्हाणे, जि. धुळे) हा रस्त्यावर खाली पडला. ट्रकचे मागील चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने तो जागीच ठार झाला. ही घटना १७ डिसेंबर रोजी ३:३० वाजेच्या सुमारास खडके खुर्दपासून एक किलोमीटर अंतरावर एरंडोल-कासोदा रस्त्यावर घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव येथे नातेवाईकाच्या लग्नात अनिल रघुनाथ पाटील व अरुण कळू मराठे हे दोघे दुचाकीने (एमएच१८/बीडब्ल्यू१८३६) मराठे गेले होते. लग्नाला हजेरी लावून साधारणपणे दीड वाजेच्या सुमारास ते अनिल पाटील यांच्या बलवाडी (भडगाव) येथील सासरवाडीस जात असताना खडके खुर्द गावापासून एक किलोमीटर अंतरावर वळणावर समोरून येणाऱ्या ट्रकने (एमएच१८/बीजी३२४०) कट मारला त्यामुळे मागे बसलेला अरुण मराठे हा रस्त्यावरून खाली फेकला गेला व ट्रकचे मागील चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने तो जागीच ठार झाला. अनिल पाटील हा दुचाकी चालवत होता. या दुर्घटनेत अनिल पाटीलसुद्धा जखमी झाला. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पोउनि विकास देशमुख किरण पाटील हे पुढील तपास करीत आहेत.