अमळनेर : प्रतिनिधी
अमळनेर बसस्थानकात रविवारी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास महिलेची पोत चोरून वरुन तिला मारहाण करणाऱ्या आणि त्यांना पकडणाऱ्या महिला पोलिसाला कानशिलात मारणाऱ्या दोन महिलांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर -चोपडा बसमध्ये प्रतिभा राजेंद्र कोळी (रा. सारबेटे) या महिलेची सोन्याची पोत बळजबरीने दोन महिलांनी चोरण्याचा प्रयत्न केला आणि तिलाच मारहाण सुरू केली. त्यावेळी बसस्थानकात ड्युटीवरील अशोक कुमावत आणि महिला पोलिस नम्रता जरे यांनी या महिलांना पोलिस स्टेशनला येण्यास सांगितले. त्यावेळी या दोघी महिलांनी जरे यांना कानशिलात मारत आणि शिवीगाळ केली. याप्रकरणी सुनीता सागर चौधरी (३९, वाघाडी पंचवटी, नाशिक) व ममता सतीश चौधरी (२५, इच्छादेवी पोलिस चौकीमागे, जळगाव) अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत. या दोघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणि जबरी चोरीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.