मुंबई वृत्तसंस्था : अंधेरीतील वर्सोवा भागात काम करण्यासाठी जाणारी अल्पवयीन नोकरानी कामावर उशिराने आल्याने तिला जबर मारहाण करून निर्वस्त्र व्हिडीओ काढल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे .या मारहाणीत अल्पवयीन नोकरानीच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी पीडितेच्या भावाने सदर मालकिनीविरोधात वर्सोवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंधेरी पश्चिमेला वर्सोवा परिसरात पीडित 17 वर्षाय मुलगी घरकाम करते. पीडिता नेहमीप्रमाणे 6 डिसेंबर रोजी घरकामासाठी सदर घरी कामावर पोहोचायला तिला थोडा उशिर झाला होता. यामुळे घर मालकीन तिच्यावर रागावली होती. पीडित मुलगी कामासठी घरी येताच रागाने लाल झालेल्या मालकिनीने मारहाण करण्यास सुरुवात केली. मालकिनीने आधी तिला गंभीररित्या मारहाण केली. त्यानंतर तिला विवस्त्र केले. एवढ्यावरच मालकिनीचा अमानुषपणा थांबला नाही. पीडितेला विवस्त्र केल्यानंतर मालकिनीने पीडितेच्याच मोबाईलमध्ये तिचा निवस्त्र व्हिडिओ काढला. तसेच निवस्त्र फोटोही काढले. त्यानंतर तिला चप्पलने जबर मारहाण करीत अर्धमेले केले.या मारहाणीमुळे अल्पवयीन पीडितेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. पीडितेला उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी पीडितेच्या भावाने वर्सोवा पोलीस ठाणे गाठत सदर मालकिनीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी बाल संरक्षण अधिनियमानुसार मारहाण, छेडछाड, अपमान आणि बाल संरक्षण अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.