नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या २०१९ मध्ये जगभरात कोरोना या आजार चव्हाट्यावर आला असतांना आता पुन्हा एकदा कोरोना व्हायरसच्या नवीन प्रकार JN.1 समोर आल्याचे समजते आहे. याच आजाराचा रुग्ण भारतात देखील आढळून आले आहेत. देशात केरळ राज्यात या विषाणूची लक्षणे आढळून आली असून, त्यामुळे दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
या संदर्भात केरळच्या शेजारील राज्य कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. केरळमध्ये कोरोना विषाणूच्या नवीन प्रकारामुळे 2 लोकांचा मृत्यू झाल्यामुळे शेजारील राज्य कर्नाटक देखील सतर्क झालं आहे. याबाबत कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी कोरोना व्हायरसच्या प्रकरणांबाबत सांगितले की, सध्या काळजी करण्याची गरज नाही. राज्यात कोविड-19 चे केवळ 58 रुग्ण सक्रिय आहेत. त्यापैकी 11 रूग्ण रूग्णालयात दाखल आहेत आणि उर्वरितांवर त्यांच्या घरी उपचार सुरू आहेत. गेल्या तीन महिन्यांत फक्त एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे, त्याला कोरोनासोबत इतर गंभीर आजार होते.
कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी सांगितले की, आम्ही आमच्या राज्यात कोरोना व्हायरसबाबत आवश्यक पावले उचलत आहोत. केरळमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर सर्व रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांना चाचणी वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या लोकांमध्ये खोकला, फ्लू किंवा कोरोना विषाणूशी संबंधित लक्षणे दिसत आहेत, त्यांची तपासणी करून उपचारासाठी आवश्यक पावले उचलली पाहिजेत.