धुळे : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात तरुण मोठ्या संख्येने बेरोजगार असल्याने अनेक तरुण उद्योगासाठी अनेक ठिकाणी कर्ज घेण्यासाठी मोठी गर्दी करीत असतात तर शून्य टक्के दराने ५० लाखांचे कर्ज देतो, यासाठी आधी विमा पॉलिसी काढा; असे आमिष दाखवून एकाने दोन जनाची फसवणूक केली. यात दोघांना दहा लाखांचा गंडा घातला असून याप्रकरणी सायबर पोलिसांत तोतया व्यवस्थापक याच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दहिवेल येथील अजय शिवाजी पाटील यांच्या फिर्यादीनुसार त्यांच्या मोबाईलवर संतोष वामन भोसले याने बजाज फायनान्स कंपनीचा अकाउंट व्यवस्थापक आहे, असे सांगून संपर्क केला. तसेच इंडिया फर्स्ट लाइफ इन्शुरन्स कंपनी लि.ची विमा पॉलिसी घेतल्यास शून्य टक्के व्याज दराने प्रत्येकी ५० लाखांचे कर्ज मंजूर करून देतो, असे सांगितले.
शिवाय हे कर्ज तुम्ही दरवर्षी पाच लाख याप्रमाणे दहा वर्षांत परतफेड करावयाचे आहे, अशी आकर्षक परतफेडीची योजना सांगितली. त्यानंतर कर्ज मंजूर झाल्याबाबतचे बनावट पत्रही दिले. त्यावर विश्वास ठेवून २२ नोव्हेंबर ते ६ डिसेंबरदरम्यान एनईएफटीद्वारे वेळोवेळी पाच लाख ९९ हजार ५०० रुपये तसेच त्यांच्या वाहिनीने तीन लाख ९९ हजार ८०० रुपयांचा भरणा केला. मात्र, पैसे भरूनही ५० लाखांचे कर्ज न मिळाल्याने अजय पाटील यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी सायबर पोलिसांशी संपर्क साधला. त्यावरून संशयित संतोष भोसले याच्याविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला.