नागपूर : वृत्तसंस्था
नागपुरातील एका मोठ्या एक्सप्लोझिव कारखान्यात रविवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर 3 जण बचावल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये 6 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. तर मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर कंपनीतील कामगाव त्यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली असून मोठा आक्रोश सुरू आहे. दरम्यान, मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. तसेच, कंपनी परिसर सील करण्यात आला असून कोणालाही आतमध्ये सोडले जात नाही.
या कारखान्यात मोठ्या प्रमाणावर दारूगोळा तसेच रसायने असल्यामुळे यात जीवितहानी झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. या स्फोटाची तीव्रता नेमकी किती होती याची अद्याप माहिती समोर येऊ शकलेली नाही. मात्र, एक इमारत उध्वस्त झाल्याची माहिती आहे. पोलिसांचे पथक तेथे पोहोचले आहे. तर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. घटनास्थळी आमदार अनिल देशमुख दाखल झाले. यावेळी ते म्हणाले, अत्यंत दुर्दैवी अपघात झालाय. सोलार एक्सप्लोसिव्ह बनवणारी ही कंपनी आहे. कंपनीच्या एका बिल्डिंगमध्ये मोठा स्फोट झाला. यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.