अमरावती : वृत्तसंस्था
दोन वर्षांपूर्वी ज्यांनी हनुमान चालिसा पठणाला विरोध केला, त्यांच्या सत्तेच्या लंकेचे हनुमानाच्या कृपेने दहन झाले आणि राज्यात सत्ता परिवर्तन झाले. रामलल्ला व हनुमान यांच्या आशीर्वादानेच सर्वसामान्यांच्या मनातील सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले. ज्यांनी १४ दिवस राणा दाम्पत्याला जेलमध्ये टाकले, त्यांची सत्ता बदलवण्याचे काम मी केले, असा टोला देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.
राज्यातील अमरावती येथे शनिवारपासून खा. नवनीत राणा व आ. रवी राणा यांनी प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे आयोजन केले आहे. यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी सायंकाळी ४.३० वाजता कथेला भेट दिली.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, खोट्या आणि अहंकारी सत्तेची हवा डोक्यातून काढण्याचे काम मी केले आहे. बाळासाहेबांचे विचार सत्तेकरिता बाजूला ठेवण्याचे काम त्यावेळी झाले होते. परंतु मी तेच विचार समोर ठेऊन कोणत्याही विचारांशी तडजोड केली नाही. ज्या राज्यात हनुमान चालिसाला विरोध केला जातो, ते राज्य काय कामाचे. याच हनुमान आणि रामाचे अयोध्येत मंदिर करण्याची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केली आणि त्याचे उद्घाटन येत्या २२ जानेवारीला होऊ घातले आहे. खऱ्या अर्थाने आता रामराज्याला सुरुवात झाली आहे, असे म्हणावे लागेल, असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला. हे सरकार शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्यांचे आहे. मी कार्यकर्ता आधी, नंतर मुख्यमंत्री आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या समस्या समजून त्यांचे निराकरण करतो. त्यामुळे हे आपले सरकार आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. उत्कृष्ट आयोजनाबद्दल त्यांनी खा. नवनीत राणा व आ. रवी राणा यांचे आभार मानले. यावेळी मंत्री संजय राठोड उपस्थित होते.