नागपूर : वृत्तसंस्था
राज्यात होणाऱ्या आगामी निवडणुकीपूर्वीच भाजप जोरदार कामाला लागली असून नागपुरात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांचा ‘महाविजय २०२४’ मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन करत असताना विरोधकांवर टीकास्र सोडले.
मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. शरद पवारांना फक्त दोन समाजाला झुंजवत ठेवायचे होते, असा गंभीर आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. आरक्षणशिवाय दुसरा मुद्दा नाही का? असे सुप्रिया सुळे महाविकास आघाडी सरकारच्या काळात म्हणाल्या होत्या, याची आठवण देवेंद्र फडणवीस यांनी करून दिली.
मराठा आरक्षणासंदर्भात देवेंद्र फडणवीस म्हणाले, मराठा आरक्षणाचा इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध कोणी केला असेल तर तो शरद पवारांनी केला आहे. महाविकास आघाडीचे सरकार होते. त्यावेळी सुप्रिया सुळेंचे वक्तव्य एकले असेल की, मराठा आरक्षणाशिवाय दुसरे मुद्दा नाहीत का? त्यापेक्षाही मोठे प्रश्न महाराष्ट्रसमोर आहेत, असे म्हणून सुप्रिया सुळे निघून गेल्या होत्या. शरद पवारांच्या काळात कोण कोणत्या यादीत आहे हे देखील विचारले जात नव्हते. तेव्हा मराठा समाजाला आरक्षण देता आले असते. पण शरद पवारांना मराठा आरक्षण द्याचे नव्हते. शरद पवारांचे राजकारण हे कसे आहे की, लोक झुंझत राहिले तर आमच्याकडे नेते पद येईल म्हणून समाजाला झुंजवत ठेवायचे, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.