छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था
७ वर्षीय चिमुकला शाळा सुटल्यानंतर घराबाहेर खेळता-खेळता एका खड्ड्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी १० वर्षीय बहिणीने देखील भरलेल्या डबक्यात उडी मारी. मात्र, पाणी जास्त असल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील बजाजनगरमध्ये घडली. समर्थ राहुल देशमुख (वय ८ वर्ष) आणि चैतली राहुल देशमुख (वय १० वर्ष) अशी मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्या बहिण-भावंडाची नावे आहेत. या घटनेनं देशमुख कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल देशमुख पत्नी आणि दोन चिमुकल्यांसह वाळूज महानगरातल्या बजाजनगरमधील इंद्रप्रस्थ कॉलनीमध्ये भाड्याने राहतात. त्यांना चैताली आणि समर्थ दोन मुले आहेत. चैताली चौथीत तर समर्थ दुसऱ्या वर्षात शिकत होता. गुरुवारी (१४ डिसेंबर) दुपारी ३ वाजेच्या सुमारास दोन्ही चिमुकले शाळा सुटल्यानंतर खेळण्यासाठी एमआयडीसीच्या मोकळा भूखंडावर गेले होते. भूखंडावर मुरूम उत्खनन केल्याने भलामोठा खड्डा पडला होता. या खड्ड्यात १० ते १५ फूट पाणी साचलं आहे.
दरम्यान, खेळता-खेळता समर्थ पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी चैतालीने देखील पाण्यात उडी घेतली. मात्र, जवळ कुणीही नसल्याने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. एका चिमुकल्याने ही घटना बघितल्यानंतर आरडाओरड केली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांनाही पाण्याबाहेर काढण्यात आले. मात्र, तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली . विशेष म्हणजे ज्या खड्ड्यांमध्ये या चिमुकल्यांचा मृत्यू झाला तो खड्डा अनधिकृत बांधकामासाठी खोदण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.