पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ठिकाणी पुरुष व स्त्री जातीचे नवजात अभ्रक अनेक ठिकाणी बेवारस आढळून येत असतांना आज पुन्हा एकदा पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात एक पुरुष जातीचे नवजात अभ्रक कचऱ्यात सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सिंहगड रस्ता परिसरातील धायरी फाटा येथील सणस शाळेजवळील एका दुकानासमोरील रस्त्यावर शुक्रवारी दि.१५ सकाळी आठच्या सुमारास हे अभ्रक सापडले आहे. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अर्भक ताब्यात घेऊन ससूनला पाठवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास एका कचरा वेचणाऱ्या व्यक्तीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात नवजात अर्भक दिसले. त्याने लगेच याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन अर्भक ताब्यात घेऊन ससून हॉस्पिटलमध्ये पाठवले. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी तपास सुरु केला असून हे बाळ कोणाचं आहे आणि असे कोण निर्दयी आई-बाप आहेत, ज्यांनी पोटच्या गोळ्याला असं कचऱ्यात फेकून दिलं. याचा तपास सिंहगड रोड पोलीस करीत आहेत.
दरम्यानं, याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी स्थानिकांची आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच हे अर्भक कचराकुंडीत कोणी फेकलं हे शोधण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहे. परंतु अशा प्रकारे नवजात अर्भकाला फेकून दिल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.