जळगाव : प्रतिनिधी
यावल तालुक्यातील अट्रावल तसेच उत्राण, ता.एरंडोल येथील गुन्हेगारी पार्श्वभूमी लाभलेल्या दोघांना स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी काढल्यानंतर गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. यावल तालुक्यातील दिवाकर उर्फ पिंटू टोपलू तायडे (41, अट्रावल, ता.यावल) तर कासोदा हद्दीतील भिकन रमेश कोळी (35, उत्राण, ता.एरंडोल) अशी स्थानबद्ध करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. दरम्यान, आगामी काळात आणखी काही उपद्रवींवर हद्दपारी तसेच स्थानबद्धतेची कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
अट्रावल, ता.यावल येथील पिंटू तायडे विरोधात यावल पोलिसात सहा गुन्हे दाखल आहेत. त्यात प्राणघातक हल्ला, दंगल, विनयभंग यासह अन्य गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. संशयिताविरोधात एक वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आहे. त्यानंतरही कृतीत सुधारणा होत नसल्याने यावल निरीक्षक राकेश मानगावकर यांनी स्थानबद्धतेचा प्रस्ताव 26 नोव्हेंबर रोजी गुन्हे शाखेकडे सादर केल्यानंतर प्रस्तावाचे अवलोकन केल्यानंतर हा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडे सादर करण्यात आल्यानंतर जिल्हाधिकार्यांनी स्थानबद्धतेचे आदेश काढले. तायडे यास कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.
उत्राण येथील भिकन कोळी विरोधात तब्बल नऊ गुन्हे कासोदा पोलिस ठाण्यात तर पाचोरा व जिल्हापेठला प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. हाणामारी, शासकीय कामात अडथळा यासह गंभीर गुन्ह्यांचा त्यात समावेश आहे. तीन वेळा प्रतिबंधात्क कारवाई करूनही त्याच्या कृतीत सुधारणा न झाल्याने कासोदा सहाय्यक निरीक्षक योगीता नारखेडे यांनी स्थानबद्धतेचा प्रस्ताव सादर केला होता. प्रस्तावाची पडताळणी झाल्यानंतर जिल्हाधिकार्यांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला व संशयिताला स्थानबद्ध करण्याचे आदेश पारीत करण्यात आले. आदेश निघताच संशयिताला अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.
यावलचा प्रस्ताव जळगाव पोलिस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, पोलिस उपअधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे तर कासोद्याचा प्रस्ताव सहा.अधीक्षक अभयसिंग देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन-पाटील, सहाय्यक फौजदार युनूस शेख इब्राहीम, हवालदार सुनील दामोदरे, जयंत चौधरी, ईश्वर पंडित पाटील आदींनी प्रस्तावकामी सहकार्य केले.