चोपडा : प्रतिनिधी
चोपड्यानजीक गुरुवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास जीममधून परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दुचाकीला बसने धडक दिल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला, तर इतर दोन जण जखमी झाले. रूपेश तुळशीराम कोळी (१७) असे ठार झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे, तर भावेश मोहन सोनवणे (१७) आणि साहिल शकील पिंजारी (१९, तिघे रा. चहार्डी, ता. चोपडा) हे जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी जीम आटोपून तिघे चहार्डीकडे निघाले होते. वाटेत समोरून येणाऱ्या बसची त्यांच्या दुचाकीला धडक बसली. यामुळे तिघेही जण दूर फेकले गेले. तिघांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. रूपेश कोळी या विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्याला शहरातीलच एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, त्या ठिकाणी उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या अपघातात साहिल व भावेश या दोघांच्या पायास फ्रैक्चर झाले आहे. साहिल यास जळगावला तर भावेश याच्यावर चोपडा येथे उपचार सुरू आहेत. रूपेश हा चहाडीं, ता. चोपडा येथील उपसरपंच तुळशीराम धनराज कोळी यांचा मुलगा आहे. चहार्डी येथील शिक्षक धनराज बडगे, पंकज विकास पाटील व डिगंबर पाटील यांनी रुग्णवाहिका बोलावून तीनही जखमींना उपजिल्हा रुग्णालयात नेले.