धरणगाव : प्रतिनिधी
वनविभागाचे झाडे तोडून शेतजमीन तयार करण्यास विरोध केल्याच्या कारणावरून वनविभागाचे महिला कर्मचाऱ्यास धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची घटना धरणगाव तालुक्यातील एकलग्न शिवारात बुधवारी घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलिसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील एकलग्न शिवारातील वनविभागात कार्यरत असलेले महिला कर्मचारी सुरेखा सुभाष पिंपळे वय-३० महिला तेथे नोकरीला असून वनविभागाच्या झाडे तोडण्यावर त्यांचे देखरेखीचे काम आहे. बुधवार १३ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता संशयित आरोपी भास्कर साहेबराव वाघ रा. एकलग्न ता. धरणगाव हा एकलग्न शिवारातील वनविभागाच्या हद्दीतील झाडे तोडून त्या ठिकाणी शेतजमीन तयार करत होता.
त्यावेळी वनविभागाचे महिला कर्मचारी सुरेखा पिंपळे यांनी त्याला विरोध केला. याचा राग आल्याने संशयित आरोपी भास्कर वाघ याने महिला कर्मचाऱ्यांशी अरेरावी करत धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. ही घटना घडल्यानंतर महिला वन कर्मचारी यांनी धरणगाव पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून दुपारी ४ वाजता संशयित आरोपी भास्कर साहेबराव वाघ रा. एकलग्न ता. धरणगाव यांच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन शिरसाट करीत आहे.