मुंबई : वृत्तसंस्था
देशात गेल्या काही वर्षापासून अनेक मोठ्या शहरातून बांग्लादेशातून येवून भारतात वास्तव्य करणारयांना पोलीस ताब्यात घेत असतांना नुकतेच मुंबईत देखील बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या ९ बांगलादेशी तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. सर्वजण बेकायदेशीरित्या भारतातून बांगलादेशमध्ये पैसे देखील ट्रान्सफर करायचे. मुंबई गुन्हे शाखेने या तरुणांविरोधात कारवाई केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी तरुणांनी बनावट आधार कार्ड बनवलं होतं. भारतातून बांग्लादेशात बेकायदेशीरपणे पैसे ट्रान्सफर करायचे. यात आणखी काही जण सहभागी असल्याचा संशय पोलिसांना आहे. हे एक प्रकारचे हवाला रॅकेट असल्याचे बोललं जात आहे. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे. भारतातून बांग्लादेशमध्ये जाणाऱ्या किंवा बांगलादेशमधून भारतात येणाऱ्या व्यक्तींमार्फत हे पैसे ट्रान्सफर केले जात होते, असं गुन्हे शाखा पोलिस उपायुक्त राजतिलक रौशन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आरोपी अनेक वर्षांपासून मुंबईत राहत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या सर्वांनी बनावट आधारकार्डद्वारे भारतात प्रवेश मिळवला होता. त्यानंतर बँक अकाऊंट आणि इतर कागदपत्रे तयार केले होते. जेणेकरुन आपण भारतीय असल्याचं त्यांना भासवायचं होतं.
आता पोलिसांनी त्या लोकांचाही शोध सुरू केला आहे ज्यांच्या मदतीने आरोपींनी बनावट कागदपत्रे बनवून घेतली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींपैकी काही लोकांना मुंबईत तर काही लोकांना ठाणे आणि नवी मुंबईतून अटक करण्यात आली आहे. आरोपी पैसे साठवल्यानंतर ते बांग्लादेशला जाणाऱ्या व्यक्तींमार्फत पैसे ट्रान्सफर करायचे. ही रक्कम जवळपास लाखात असायची. पैसे बेकायदेशीरपणे ट्रान्सफर करण्यासाठी ते कमिशन घ्यायचे. नेमकी किती रक्कम होती हे आताच सांगता येणार नाही, असंही पोलिसांनी सांगितले. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.