धुळे : प्रतिनिधी
राज्यात अवकाळी पावसाचा हाहाकारामुळे अनेक शेतकरी त्रस्त झाले असून काहींनी तर आता शेतीच्या पिकावर रोटावेटर फिरविल्याच्या देखील अनेक घटना घडत असतांना खान्देशातील देखील शेतकरी हा मार्ग अवलंबू लागले आहे. रब्बी हंगामात उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्याने तीन एकर क्षेत्रावर मक्याची लागवड केली होती. पिकाची थोडी वाढ झाल्यानंतर त्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरवात झाली. यामुळे शेतकऱ्याने तीन एकरातील मका पिकावर रोटावेटर फिरविला.
शिरपूर तालुक्यातील भामपुर या परिसरात दीपक पाटील या शेतकऱ्याने तीन एकर क्षेत्रात मका पिकाची लागवड केली होती. सततच्या हवामान बदलामुळे मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्याने तीन वेळा औषध फवारणी केली. तरी देखील कुठल्याही प्रकारचा अळीचा प्रादुर्भाव कमी होत नव्हता. यामुळे त्रासलेल्या शेतकऱ्याने हे पाऊल उचलत आपल्या तीन एकरातील मोठा खर्च करून जतन केलेल्या संपूर्ण मक्का पिकावर रोटावेटर फिरवला आहे. महागाचे बियाणे घेऊन मका पिकाची लागवड दीपक पाटील यांनी केली होती. शिवाय लष्करी अळी पडल्याने त्यावर औषधी फवारणी देखील केली. मात्र तीन एकरावरील मका पिकावर रोटावेटर फिरवला आहे. यामुळे केलेला खर्च वाया गेला आहे.