नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पाकिस्तानच्या अशांत खैबर पख्तूनख्वा प्रांतातील सुरक्षा दलाच्या एका चौकीवर मंगळवारी पहाटेच्या सुमारास भीषण दहशतवादी हल्ला झाला. सहा दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेला ट्रक चौकीमध्ये घुसवल्यानंतर लागोपाठ आत्मघाती स्फोट केला. या हल्ल्यात २३ जवान ठार, तर अनेक जण जखमी झाले. सर्व दहशतवाद्यांना मारण्यात यश आल्याची माहिती पाकच्या लष्कराने दिली. तेहरिक-ए-जिहाद पाकिस्तान (टीजेपी) या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.
अशांत डेरा इस्माइल खान जिल्ह्यातील सुरक्षा दलाच्या चौकीवर दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेले ट्रक धडकवले. यानंतर भीषण आत्मघाती स्फोट घडवण्यात आल्याने इमारत कोसळली. चौकीच्या मुख्य प्रवेशद्वारावर ट्रकला रोखण्याचा प्रयत्न झाला होता. पण दहशतवाद्यांनी ट्रक थेट इमारतीवर धडकवल्याने एकच खळबळ उडाली. दहशतवादी हल्ला करणाऱ्या सर्व ६ दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे. घटनास्थळी सुरक्षा दलाची नवीन तुकडी पाठवत तपास अभियान सुरू करण्यात आल्याची माहिती लष्कराने दिली. नवीन दहशतवादी संघटना टीजेपीचा मुख्य प्रवक्ता मुल्लाह कासीमने हल्ल्याची जबाबदारी घेत ही आत्मघाती मोहीम असल्याचे म्हटले. हल्ल्याची तीव्रता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे. हल्ल्यानंतर जिल्हा रुग्णालयांमध्ये आणीबाणीची स्थिती घोषित करण्यात आली असून, सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली. या दहशतवादी संघटनेने यापूर्वीदेखील पाकमध्ये मोठे हल्ले घडवून आणले आहेत. ४ नोव्हेंबर रोजी या संघटनेने पाक हवाई दलाच्या प्रशिक्षण तळावर हल्ला केला होता. या हल्ल्यात तीन विमानांचे नुकसान झाले होते. लष्करी अभियान राबवत हल्ला करणाऱ्या सर्व दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.