परभणी : वृत्तसंस्था
राज्यातील अवकाळी पावसाने शेतकऱ्यांन चांगलेच हैराण केले असतांना त्यामुळे अनेकांचे उत्पन्नात मोठी घट देखील झाली आहे. वेचणीवर आलेला कापूस अवकाळी पावसाने भिजल्यामुळे त्याची पत खालावली आहे. या पावसाने भिजलेल्या कापसाला भाव देखील कमी दिला जात आहे. शेतकऱ्याला ६ हजार इतका दराने हा कापूस विकावा लागत आहे.
परभणी जिल्ह्यात गेल्या महिन्यात सहा दिवस अवकाळी पाऊस झाला. रब्बी हंगामासाठी जमिनीत ओलावा वाढल्याने अवकाळीचा पाऊस पोषक ठरला. त्याचवेळी वेचणी राहिलेल्या शेतासाठी घातक ठरला आहे. या पावसाने फुटलेला कापूस भिजला, काही ठिकाणी खाली पडल्याने प्रतवारी खराब झाली आहे. शिवाय हा कापूस भिजला असल्याने व्यापारी आता कमी भावात मागत आहेत.
जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसाने आधीच उत्पादनात कमी आले असताना अवकाळीने त्यात भर घातली आहे. फुटलेल्या बोंडामधील कापूस भिजल्याने प्रतवारी कमी झाली व त्यात ओलावा असल्याने पांढरे सोने मातीमोल झाले आहे. सद्य:स्थितीत या रेनटच कापसाला सहा हजार ते ६ हजार ५०० रुपये क्विंटल भाव मिळत असल्याने उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.