जळगाव : प्रतिनिधी
जुना वाद उफाळून समतानगर परिसरात रविवारी झालेल्या अरुण बळीराम सोनवणे (२८, रा. समता नगर) या तरुणाच्या खूनप्रकरणी पाच जणांविरुद्ध रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुना वाद तसेच मयताचे पुतणीसोबत होणाऱ्या विवाहाला मारेकऱ्याचा असणारा विरोध यातून हा खून झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, समतानगर परिसरात रविवारी अरुण सोनवणे या तरुणाचा खून झाला. याप्रकरणी मयताचा भाऊ गोकुळ बळीराम सोनवणे याने रात्री रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, त्याचा चुलत भाऊ गणेश सोनवणे याच्यासोबत झालेला वाद मिटविण्यासाठी अरुण सोनवणे व त्याचा मित्र आशिष सोनवणे यांना सोनू आढाळे (रा. समतानगर) याने वंजारी टेकडी येथे बोलावले. तेथे गेल्यानंतर आढाळेसह पप्पू आढाळे, बळीराम चव्हाण, अशोक राठोड, योध्या ऊर्फ पिंट्या शिरसाठ (पूर्ण नाव समजू शकले नाही) सर्व रा. समतानगर यांनी अरुणच्या शरीरावर चॉपरने सपासप वार करून गळा चिरून ठार मारले. तसेच, आशिष सोनवणे याच्यावरही चॉपरने वार करून जखमी केले. तेथे गोकुळ सोनवणे हा भांडण सोडविण्यासाठी गेला असता त्याच्यावरही वार करण्यात आल्याने तो जखमी झाला.
अरुण बळीराम सोनवणे (२८, रा. समतानगर) या तरुणाच्या खूनप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर सोनू आढाळे (रा. समतानगर) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. खुनाच्या घटनेनंतर मारेकरी पसार झाले होते. त्यांच्या शोधासाठी एलसीबीचे तीन पथके तयार करून तपासकामी रवाना केले. सोनू आढाळे हा सुरतला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यावरून एका पथकाने सोनूला विसरवाडीजवळून ताब्यात घेतले. अन्य तिघांचादेखील पथकाकडून शोध सुरू आहे.
सुरुवातीला जुन्या वादातून खून झाल्याचे सांगण्यात येत होते. त्यासोबतच आता फिर्यादीत मयताच्या भावाने म्हटले आहे की, मारेकऱ्यांपैकी योध्या ऊर्फ पिंट्या शिरसाठच्या पुतणीसोबत होणाऱ्या अरुणच्या विवाहाला योध्याचा विरोध होता. त्यातून हा खून करण्यात आल्याचे मयताच्या भावाने म्हटले आहे. याप्रकरणी रविवारी रात्री वरील पाचही जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि विठ्ठल पाटील करीत आहेत.