मुंबई : वृत्तसंस्था
मागील दोन आठवड्यांपूर्वी अवकाळी पावसामुळे प्रचंड फटका बसला आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. यानंतर आता अधूनमधून होत असलेल्या वातावरणातील बदलामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. यामुळे शेतकऱ्यांपुढे एकामागून एक संकट उभे आहे.
अवकाळी पावसानंतर वातावरण बदलले आहे. या बदललेल्या वातावरणाचा परिणाम पिकांवर झालेला पाहावयास मिळत आहे. यात हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
अकोला जिल्ह्यातल्या पातूर तालुक्यातील राहेर परिसरात गत काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. तर रब्बी हंगामातील गहू, तूर व हरभरा आदी पिकांवर विविध किडींनी हल्लाबोल केल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या किडींच्या बंदोबस्तासाठी पुन्हा शेतकऱ्यांना कीटकनाशक फवारण्याची वेळ आली आहे. पण या बदलत्या वातावरणामुळे हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने हरभरा पीक सुकायला लागले असल्याने राहेर येथील शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.