नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात बदलत्या हवामानामुळे अनेक शेतकरी त्रस्त झाले असतांना आता अनेकांना थंडीचा तडाखा बसणार आहे. बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेल्या मिचाँग चक्रीवादळामुळे देशासह राज्यातील वातावरणात अनेक बदल झाले. यामुळे राज्यातील काही भागांमध्ये मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाचे सावट होते. मात्र आता अवकाळीचे सावट आता कमी झाले आहे. तर येत्या काही दिवसात राज्यात थंडी वाढण्याचा अंदाज आहे. तर कोकण पट्ट्यामध्ये वातावरणातील चढ उतार कायम असतील.
राज्यातील किमान तापमानत 2 ते 3 अंशांची घट होणार आहे. तर उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळं रात्रीचे तापमान 18 ते 19 अंशांदरम्यान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर पहाटे गारठा, दिवसा काहीसा उकाडा आणि रात्री थंडी असे हवामान येत्या काही दिवसात पाहायला मिळणार आहे. विदर्भात किमान तापमानात घट होत आहे. त्यातच आता विदर्भात पारा आणखी घसरण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्यात तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. रविवारी निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी 12.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.
आग्नेय अरबी समुद्रात मालदीव बेटांजवळ समुद्रसपाटीपासून 5.6 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. राज्यात काही ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान दिसून येत आहे. पहाटे गारठा तर दुपारी उकाडा अशी स्थिती अनुभवायला मिळत आहे. तर कमी-अधिक प्रमाणात धुक्यासह दव पडल्याचे चित्र कायम आहे. यातच राज्याच्या किमान तापमानात 2 ते 3 अंशांची घट होण्याची शक्यता असल्याने थंडी हळूहळू वाढत जाणार आहे.