पारोळा : प्रतिनिधी
तालुक्यातील शिवरे येथील २९ शेतमजुरांना शेतातील अशुद्ध पाणी पिल्यामुळे विषबाधा झाली. तामसवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर चेतन पाटील यांनी प्रसंगावधान राखून त्यांच्यावर प्रथमोपचार केले. या मजुरांची प्रकृती सुधारत आहे. दरम्यान, यातील एक वर्षाच्या बाळाची प्रकृती नाजूक असल्याने पुढील – उपचारासाठी धुळे येथे पाठवण्यात आले आहे.
शिवरे येथील शेत शिवारात काम करण्यासाठी मध्य प्रदेशातील पानसेमल येथील शेतमजूर कामासाठी आलेआहेत. शेतात काम करीत असताना एका मोठ्या ड्रममध्ये असलेले दूषित पाणी ते पिल्यामुळे त्यांना मळमळ होऊ लागली तर काहींना वांत्या होऊ लागल्या. त्यामुळे त्यांना तामसवाडी आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे डॉ. चेतन पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्यावर प्रथमोपचार करून पारोळा कुटीर हॉस्पिटलला पाठवण्यात आले. येथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.