जळगाव : प्रतिनिधी
मालवाहून रिक्षा घेवून जात असलेल्या रिक्षा चालकाला दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी मारहाण केली. त्यानंतर रिक्षा चालकाच्या खिशातील रोकड आणि महत्वाचे कागदपत्रे जबरदस्तीने काढून घेत पहून गेले. ही घटना शुक्रवारी दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सुप्रिम कंपनीच्या गेटसमोर घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील मुसळी येथील गोपाल एकनाथ शिंदे यांच्याकडे मालवाहू रिक्षा आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास गोपाल शिंदे हे एमआयडीसी परिसरातील सुप्रिम कंपनीच्या गेटसमोरुन जात होते. यावेळी दुचाकीवरुन दोन तरुण त्यांच्याकडे आले. त्यांनी रिक्षा चालक शिंदे पकडून खाली उतरविले. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत गंभीर जखमी केले. तसेच शिंदे यांच्या पॅन्टच्या खिशातून साडेतीन हजार रुपये आणि महत्वाची कागदपत्रे जबरदस्तीने काढून घेत दोघ चोरट्यांनी तेथून पळ काढला. ही घटना घडल्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या गोपाल शिंदे यांनी लागलीच एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी हे करीत आहे.