चोपडा : प्रतिनिधी
नाशिक, धुळे, जळगाव येथील अन्न व औषध प्रशासनाच्या संयुक्त पथकाने कारवाई करत चोपडा येथील चार गुटखा विक्रेत्यांकडून सुमारे १ लाख ६७ हजारांचा गुटखा जप्त करत चारही दुकानांना सील केले आहे. आठवडाभरात ही सलग दुसरी कारवाई असल्याने अवैध गुटखा विक्रेत्यात खळबळ माजली आहे.
चोपडा शहरात सकाळी १० वाजता नाशिक व जळगाव, धुळे येथील अन्न व औषध प्रशासन पथकाने एकूण चार दुकानदारांची तपासणी करत दुकानात विकल्या जाणाऱ्या विमल पान मसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी जप्तीची कारवाई केली. एकूण १ लाख ६७ हजार २५७ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. चार जणांकडे छापा टाकला असता एकूण १ लाख ६७ हजार २५७ रुपये किमतीचा विमल पान मसाला, सगंधित तंबाख, सगंधी सुपारी अशा बंदी असलेल्या वस्तू विक्री करण्यासाठी साठा करून ठेवल्याचे आढळून आले. या दुकानावर सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत कारवाई सुरू होती. चारही दुकानाना सील करण्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त संजय नारागडे (नाशिक), जळगाव येथील सहायक आयुक्त संतोष कांबळे, अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार, के. एच. बाविस्कर, गोपाळ कासार, अविनाश धाबाडे, योगेश देशमुख, उमेश सूर्यवंशी हे पथक या कारवाईत सहभागी होते. अन्न व सुरक्षा अधिकारी शरद पवार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.