जळगाव : प्रतिनिधी
शहरातील मनियार लॉ कॉलेज परिसरात राहणाऱ्या एका महिलेच्या नावे एमआयडीसीत असलेला प्लॉट हा पॉवर ऑफ अॅटर्नीचे बनावट दस्ताऐवज तयार करून २ जणांना विक्री केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बुधवारी रात्री दोन जणांविरोधात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मणियार लॉ कॉलेज परिसरातील मंजुदेवी लिच्छिराम छाजेड (वय ५७) या परिवारासह वास्तव्याला आहे. मंजुदेवी छाजेड आणि त्यांची वहिनी मंजुदेवी अशोककुमार बुच्चा यांच्या नावावर एमआयडीसी वसाहतमध्ये एम. सेक्टर मधील प्लॉट नंबर २११ येथे १५०० स्क्वेअर मीटर जागा आहे. दरम्यान, त्यांची वहिनी मंजुदेवी बुच्चा आणि त्यांचा भाऊ अशोककुमार मोतीलाल बुच्चा (दोन्ही रा. गंधर्व कॉलनी) यांनी संगनमताने पॉवर ऑफ अॅटर्नीचे बनावट दस्ताऐवज तयार करून हा प्लॉट सुहास विश्वनाथ मुळे व अमोल विश्वनाथ मुळे यांना परस्पर विक्री केल्याचे समोर आले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर फिर्यादी मंजुदेवी छाजेड यांनी बुधवारी रात्री जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन दोघांविरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार दिलेल्या तक्रारीवरून मंजुदेवी बुच्चा आणि अशोककुमार बुच्चा यांच्या विरोधात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश देशमुख करीत आहे.