सोलापूर : वृत्तसंस्था
जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षण विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्याकडे भ्रष्ट व गैरमार्गाने कायदेशीर आणि ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक किंमतीची अपसंपदा आढळून आल्याने लोहार यांच्यासह त्यांची पत्नी, मुलगा यांच्यावर सदर बझार पोलिस ठाण्यात बुधवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक यांनी फिर्याद दिली आहे.
तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण अनंत लोहार (५०), पत्नी सुजाता किरण लोहार (४४), मुलगा निखिल किरण लोहार (२५, रा. प्लॉट नं. सी. २, आकांक्षा शिक्षक कॉलनी, पाचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. लोहार यांनी परीक्षण कालावधीमध्ये भ्रष्ट व गैरमार्गाने कायदेशीर आणि ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक ५ कोटी ८५ लाख ८५ हजार ६२३ रुपयांची अपसंपदा जमविली आहे. त्यांची पत्नी सुजाता व मुलगा निखिल यांनी किरण लोहार यांना भ्रष्ट मार्गाने अपसंपदा संपादित करण्यास सहाय्य केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधातही गुन्हा दाखल झाला आहे.