चेन्नई-कुन्नूर वृत्तसंस्था: परिसरातील निलगिरी पर्वत रांगामध्ये सीडीएस बिपीन रावतांचे हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून, दोघे जखमी झाले आहेत.या हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे बडे अधिकारी आणि रावत त्यांच्या पत्नीसह होते. हेलिकॉप्टर कोसळले आणि आगीचे भीषण लोट उसळले.
वेलिंग्टन येथील सशस्त्र दलाच्या महाविद्यालयात सीडीएस बिपीन रावत हे आपल्या पत्नीसह कार्यक्रमासाठी गेले होते. या ठिकाणी रावत यांचे व्याख्यान होते. हा कार्यक्रम आटोपून ते कुन्नूरला परतत होते. तेव्हा निलगिरी पर्वत रांगामध्ये दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी हा अपघात झाला.हेलिकॉप्टरमध्ये एकूण 14 जण होते. त्यात रावत, रावत यांच्या पत्नी, संरक्षण सहाय्यक, सुरक्षा कमांडो आणि आएएफ पायलट यांचा समावेश आहे.
तामिळनाडूत गेल्या काही दिवसांपासून प्रचंड पाऊस सुरू असल्याने वातावरण खराब आहे. यामुळेच ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. या दुर्घटनेवर लष्कराकडून अद्याप कोणतीही माहिती आलेली नाही.
कुन्नूरच्या घनदाट जंगलात अपघात इतका भयानक होता की, दूरवरून आगीचे लोळ उठताना दिसत होते.परिसरातील नागरिक, पोलीस, लष्कराचे जवान आणि हवाई दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.हेलिकॉप्टर इतक्या वेगाने कोसळले की उभी झाडेही कापली गेली. हिरव्यागार झाडांना आग लागली. घटनास्थळावर बचावकार्य आणि शोधमोहीम सुरू केली आहे.मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच त्यांची ओळख पटवण्यात येत आहे.
चौकशीचे दिले आदेश…
माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीडीएस बिपीन रावत यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हेलिकॉप्टरमध्ये रावत यांच्यासह लष्कराचे वरिष्ठ अधिकारी, रावत यांची पत्नी मधुरीका रावतही होत्या. मात्र, यातील अनेक जणांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती हवाई दलाने दिली आहे.