मुंबई : वृत्तसंस्था
दिवाळीनंतर सोन्याच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळाली होती. मात्र मंगळवारी ५ डिसेंबर एकाच दिवसात एक हजार ३०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे सोने ६३ हजार रुपये प्रति तोळ्यावर आले आहे. चांदीच्या भावातदेखील दोन हजार रुपयांची घसरण होऊन ती ७६ हजार रुपये प्रति तोळ्यावर आली आहे.
गेल्या आठवड्यापासून सोने- चांदीचे भाव सतत वाढत असून सोमवारी सोने ६४ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर तर चांदीदेखील ७८ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली होती. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात भाव वाढल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर सट्टा बाजारात अचानक सोने-चांदी विक्रीला काढण्यात आले. त्यामुळे त्यांचे भाव कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या परिणामामुळे मंगळवारी सोन्याच्या भावात १३०० रुपयांची तर चांदीत दोन हजार रुपयांची घसरण झाली.