जळगाव : प्रतिनिधी
पुणे असलेल्या मुलाकडे गेलेल्या अनिल पंडित कुरकुरे (रा. भिकमचंद नगर) यांच्या बंद घरात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे. याठिकाणाहून चोरट्यांनी रोकड व सोन्याचे दागिने असा एकूण ९७ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपनगर औष्णिक केंद्रातून निवृत्त झालेले अनिल कुरकुरे यांचे शहरातील भिकमचंद जैन नगरमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांचा मुलगा सागर कुरकुरे हे पुणे येथे नोकरीला आहे. त्यामुळे दि. ३० नोव्हेंबर रोजी कुरकुरे दाम्पत्य पुणे येथे मुलाकडे गेले होते. तेव्हापासून त्यांचे घर बंदच असल्याने चोरट्यांनी हीच संधी साधत त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केल. तसेच घरातील रोख पाच हजार रुपये तसेच सोन्याचे दागिने असा एकूण ९७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. कुरकुरे यांच्या नातेवाईकांचे निधन झाल्याने कुरकुरे कुटुंबीय जळगावी परतले. यावेळी त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला, त्यांनी घरात जावून पाहणी केली असता, त्यांना घरात चोरी झाल्याचे समजले. सागर कुरकुरे यांनी दि. ३ डिसेंबर रोजी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि किशोर पवार करीत आहेत.