मुंबई : वृत्तसंस्था
देशात मिचाँग चक्रीवादळामुळे राज्यांत पुढील २४ तासांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या दाबाच्या पट्ट्याचे तीव्र दाब क्षेत्रात रूपांतर झाले आहे. त्यामुळे त्याचे आता मिचॉन्ग चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. त्यामुळे 4 डिसेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत देशासह राज्यांत मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
अनेक भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे भारतीय हवामान विभागाने देशातील तमिळनाडू, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. येत्या 24 तासांत महाराष्ट्रातही पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. त्यामुळे आधीच शेतीचे मोठं नुकसान झाले आहे. आता पुन्हा एकदा राज्यात पावसाचा इशारा देण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.