जळगाव : प्रतिनिधी
वाळू चोरीसह वेगवेगळे गुन्हे दाखल असलेल्या संजय सुरेश त्रिभुवन (वय २६, रा. वाक, ता. भडगाव) या वाळू माफियाविरुद्ध एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करीत त्याला स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले. त्यानुसार ३ डिसेंबर रोजी त्याची नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, रेकॉर्डवरील गुन्हेगार संजय त्रिभुवन याच्याविरुद्ध भडगाव, पाचोरा पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल असण्यासह तीन वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तरीदेखील त्याच्या वर्तणुकीत सुधारणा न झाल्याने भडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी त्याच्या स्थानबद्धतेचा प्रस्ताव जळगाव स्थानिक गुन्हे शाखेकडे पाठविला. हा प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे रवाना करण्यात आला. त्यानुसार संजयला स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. या प्रस्तावाचे कामकाज पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील, सहायक फौजदार युनूस शेख इब्राहिम, पोहेकाँ सुनील दामोदरे, जयंत चौधरी, पोकाँ ईश्वर पाटील यांनी पाहिले. पोउनि शेखर डोमाळे, पोकाँ, प्रवीण परदेशी, संदीप सोनवणे, जितू राजपूत यांनी त्रिभुवन याला ताब्यात घेत नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली.