जळगाव : प्रतिनिधी
इन्स्टाग्राम खात्यावरील फोटोंना लाईक करण्याचे टास्क देऊन व सुरुवातीला काही रक्कम देऊन डॉ. प्रणव परशुराम सामृतवार (२८, रा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वसतिगृह, मूळ रा. उमरसरा, जि. यवतमाळ) यांची १२ लाख ४२ हजार ३७० रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातील डॉ. प्रणव सामृतवार हे सध्या जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहतात. त्यांच्याशी ९ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर या दरम्यान वेळोवेळी एका इन्स्टाग्राम खात्यावरून संपर्क साधण्यात आला. त्यात फोटोंना लाईक करण्यासह वेगवेगळे टास्क देण्यात आले. सुरुवातीला त्यांना नऊ हजार १५० रुपये देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांना अधिक पैशाचे आमिष दाखवत गुंतवणूक करण्यास सांगितली. त्यानुसार त्यांनी तशी गुंतवणूक केली. मात्र कोणताही मोबदला मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून २ डिसेंबर रोजी रात्री अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपअधीक्षक (गृह) रामकृष्ण कंभार करीत आहेत.