जळगाव : प्रतिनिधी
मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा येथील शेतात बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या पिंप्राळा येथील तरुणावर बिबट्याने अचानक हल्ला करून त्याला जखमी केले. मात्र सुदैवाने तो तरुण बिबट्याच्या तावडीतून सुटला. आणि त्याचे प्राण वाचले.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंप्राळा येथील गणेश गणपत झाल्टे (वय ३२) हा दिव्यांग आहे. तो धुपेश्वर रस्त्यावरील शेतात बकऱ्या चारण्यासाठी गेला होता. दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास जंगलात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घातली. गणेश याने आरडाओरडा करत रस्त्याकडे धाव घेतली.
त्यानंतर बिबट्याने पलायन केले. यात गणेशच्या खांदा आणि हाताला जखमा झाल्या आहेत. त्याला कुन्हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. वढोदा वनक्षेत्र कार्यालयाचे वनपाल धुडगुंडे, वनरक्षक अक्षय मोरे, स्वप्निल गोसावी, पोलिस पाटील महादेव झाल्टे यांनी रुग्णालयात येऊन जखमीची विचारपूस केली. नंतर त्याला पुढील उपचारासाठी त्याला जळगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वढोदा वनक्षेत्राचे प्रभारी वनक्षेत्रपाल दत्तात्रय लोंढे यांनी जळगाव येथील शासकीय रुग्णालयात जखमी गणेशची भेट घेऊन विचारपूस केली.