वर्धा : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात अपघाताच्या घटना घडत असतांना अशीच एक भीषण अपघाताच्या घटना वर्धा जिल्ह्यातून समोर आली आहे. शाळेत शिकणाऱ्या लहान बहिणीला भेटण्यासाठी स्कुटीवरून जाणाऱ्या मोठ्या बहिणीला ट्रकने धडक दिली. या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला आहे. काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना शुक्रवारी आर्वी शहरातील एचडीएफसी बॅकेसमोर घडली. अपघातानंतर नागरिकांनी मोठी गर्दी करून ट्रकची तोडफोड केली.त्यामुळे दोन वाहतूक ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे वाहतूक सुरळीत झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात प्रियाक्षी रमण लायचा (वय १९, रा. आर्वी) हिचा मृत्यू झाल आहे. प्रियाक्षी तंत्रनिकेतन पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत होती. ती कृषक कन्या शाळेत शिकणाऱ्या आपल्या लहान बहिणीला आधार कार्ड व ३० रुपये देण्यासाठी दुचाकीवरून जात होती. यादरम्यान, मुख्य मार्गावरील बँकेसमोर समोरून येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता, की यामध्ये प्रियाक्षी ट्रकच्या समोरील चाकाखाली आली. त्यामुळे चिरडल्या गेल्याने तिचा जागेवरच जीव गेला. दरम्यान, या भीषण अपघाताची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली. नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन गर्दी केली. संतप्त नागरिकांनी अपघातग्रस्त ट्रकची तोडफोड केली.काहीवेळा मार्गावरील वाहतूक ठप्प पडली होती. पोलिसांच्या तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेनं परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.