मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या पाच दिवसापासून गारपिटीसह अवकाळी पाऊस सुरु असतांना आता वातावरणात सुधारणा होत असतानाच राज्यात अचानक आलेल्या दाट धुक्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत अजून भर पडली. अरबी समुद्रावरून आलेले वारे आणि ढगाळ हवामानामुळे वाढलेली आर्द्रता याचा परिणाम म्हणून शुक्रवारी सकाळी राज्याच्या काही भागात दाट धुक्याची लहर पसरली होती. त्यामुळे १५ ते २० फूट अंतरावरील दिसत नव्हते. आगामी दोन दिवस असेच वातावरण राहिल, त्यानंतर धुके कमी होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविला आहे. धुक्यामुळे गारपीटीच्या तडाख्यातून उरलेल्या पिकांवर रोगराई पसरण्याची चिंता निर्माण झाली आहे.
दरम्यान, पावसाळी वातावरण हळूहळू निवळत असून उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण या भागात किमान आणि कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सियसने घट होत आहे. त्यामुळे वातावरणामध्ये गारवा जाणवत आहे. कोकण -मुंबईसह कोकणात फक्त शुक्रवारी ढगाळ वातावरण राहिले. शनिवारपासून पूर्णतः उघडीप होईल. दरम्यान, ४ डिसेंबर रोजी तामिळनाडू व आंध्र किनारपट्टी सीमावर्ती भागात मिचोंग हे चक्रीवादळ आदळणार आहे. मात्र महाराष्ट्रावर त्याचा कोणताही परिणाम जाणवणार नाही.