मुक्ताईनगर : प्रतिनिधी
शहरातील प्रवर्तन चौकाजवळ तीन दुकानांना अचानक आग लागली. या आगीत बूट, चप्पल व गोळ्या बिस्किटांचे दुकान खाक झाले तर किराणा दुकानाला मोठा फटका बसला आहे. सुमारे सात लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याचा अंदाज आहे. ही घटना गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली.
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी लागलेल्या या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीच्या कारणावरून शहरात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. या दुकानांमधून आगीचे लोळ उठताना दिसताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. बूट व चप्पलचे दुकान तसेच गोळी-बिस्किट पान मसाल्याचे दुकान या आगीत जळून खाक झाले. मुख्य चौकातील या घटनेमुळे प्रचंड गोंधळ उडाला. आगीने रौद्ररूप धारण केल्याने सावदा व इतर ठिकाणावरून अग्निशमन बंब पाचारण करण्यात आले.
घटनास्थळी पोलिस निरीक्षक नागेश मोहिते व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ धाव घेत मदतकार्य केले. पोलिस व नागरिकांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आली. या भागात अनेक दुकाने आहेत. त्यांनाही झळ बसली असती. नागरिक वेळीच धावले नसते तर मोठा अनर्थ घडला असता.