पाचोरा : प्रतिनिधी
तालुक्यातील नगरदेवळाजवळील निपाणे येथील शेतकरी हिरमण दीपचंद पाटील यांच्या शेतात ऊसतोड सुरू असताना मजूर महिलेवर बिबट्याने हल्ला केला. मात्र महिलेने आणि मजुरांनी आरडाओरड करताच बिबट्याने धूम ठोकली. ही घटना दि. १ रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. पावलांच्या ठशांवरून हा बिबट्याच असल्याची पुष्टी वनविभागाने केली आहे.
निपाणे सरपंच रोशन पाटील व गावातील युवकांनी पुढाकार घेत बराच वेळ बिबट्याला शोधण्याचा प्रयत्न केला वनविभागाचे कर्मचाऱ्यांना पाचारण केले. त्यांनी पावलांच्या ठशांवरून हा बिबट्याच असल्याचे स्पष्ट केले आणि वनपाल प्रकाश देवरे यांनी शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. याआधी दि. १२ नोव्हेंबर रोजी सीताराम पाटील यांच्या शेतातील सात वासरांचा फडशा बिबट्याने पाडला होता. बिबट्याच्या वाढलेल्या वावरामुळे शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत.