सातारा : वृत्तसंस्था
साताऱ्यातील पुणे-बेंगळुरू महामार्गावर गुरुवारी रात्री डीजेचा दणदणाट पाहायला मिळाला. गौरीशंकर कॉलेज परिसरात डीजे व्यावसायिकांसह दोन गट आमने-सामने आले. यावेळी दोन्ही गटाकडून एकमेकांना खुन्नस देत तलवारी नाचवण्यात आल्या. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.
“माझ्या डॉल्बीचा आवाज मोठा की तुझ्या डॉल्बीचा आवाज मोठा”, अशी खुन्नस देत दोन्हीही गटांनी डीजेचा दणदणाट सुरू केला. यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. दोन्ही गट एकमेकांना तलवारीचा धाक दाखवून खुन्नस देत असल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं.
याप्रकरणी सातारा पोलिसांनी ३० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. आतापर्यंत ७ जणांना अटकही करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-बेंगळुरू महामार्गावरील गौरीशंकर कॉलेज परिसरात गुरुवारी रात्री दोन गट आमने-सामने आले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पोलिसांनी अशा टवाळखोरांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.