धरणगाव : प्रतिनिधी
बसस्थानकाच्या पाठीमागे राहणारे नागरिक बाहेरगावी गेल्याने त्यांच्या घरातील दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातील दोन लाख रुपये चोरट्यांनी लांबविले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील रुख्मिणीनगरात राहणारे गुलाब सुभाष सोनवणे हे हरिद्वार येथे गेले आहेत. त्यांचे घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या पुढील दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यांनी कपाट उघडून आत ठेवलेले २ लाख रुपये घेऊन मागील दरवाजाने पसार झाले. सकाळी त्यांच्या भावाला माहिती मिळताच त्यांनी पाळधी पोलिस चौकीत धाव घेतली, पोलिसांनी पाहणी केली व पंचनामा केला. हे पैसे प्लॉट घेण्यासाठी ठेवले होते. घटनास्थळी पोनि उद्धव ढमाले, सपोनि सचिन शिरसाठ यांनी भेट देऊन पाहणी केली. याबाबत त्यांचे भाऊ परेश सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि सचिन शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली वसंत निकम आदी करीत आहेत.



