धरणगाव लक्ष्मण पाटील : शहरालगत असलेल्या १ एकर जागा ही गायरानसाठी राखीव असतांना त्यावर अतिक्रमण केले जात आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते शिरीष बयस यांनी वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. याच्या निषेधार्थ ८ डिसेंबर २०२१ रोजी शांततेत मुक मोर्चा काढण्यात येणार आहे.
याबाबत माहिती अशी की, धरणगाव शहराच्या लगत असलेल्या अमळनेर रोडवर ३ हेक्टर ५१ आर जागा ही पुर्वापार गायरान म्हणून वापर केला जात आहे. सातबारा उताऱ्यावर देखील गायरान असल्याचा उल्लेख आहे. परंतु शहरातील काही समाजकंटकांनी मुंबई येथील मानवसेवा संकल्प प्रतिष्ठानला हाताशी घेवून सदरील गायरानची जागा हडप करण्याच्या हेतूने या जागेवर बेकायदेशीर बांधकाम केले आहे. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते शिरीष बयस यांनी २८ डिसेंबर २०१५ रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दिली होती. या तक्रारीकडे तत्कालिन जिल्हाधिकारी यांनी धरणगाव मुख्याधिकारी यांना अतिक्रमण काढण्याबाबत सुचना दिल्या होत्या. तरी देखील अद्याप गायरान जागेवरील अतिक्रमण काढण्यात आलेले नाही. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याबाबत गायरान बचाव मंचने तहसिलदार यांना २० ऑक्टोबर रोजी निवेदन दिले तरी देखील अंमलबजावणी झालेली नसल्याने बुधवारी ८ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ९ वाजता गायरान बचाव मंचच्या वतीने शांततेत मुक मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चात पशुधन पालक, शेतकरी आदी सहभाग नोंदविणार आहेत. यावेळी २२ हजार नागरिकांचे सह्यांचे निवेदन धरणगाव तहसिलदार यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती गायरान बचाव मंचचे शिरीष बयस यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.