मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या चार दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तुफान अवकाळी पाऊस सुरू असून शेतीपिकांचं मोठं नुकसान झालं आहे. खरीप हंगामातील पिकांसह फळबागा उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अवकाळीचं संकट कधी दूर होणार? असा प्रश्न बळीराजाला पडला आहे. अशातच भारतीय हवामान खात्याने अवकाळी पावसाबाबत मोठी अपडेट दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीच भर पडली आहे.
भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, येत्या २४ तासांत राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता आहे. हवामान विभागाने पुण्यासह नाशिक, अहमदनदर, छत्रपती संभाजीनगर, बीड या जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे. यासोबतच विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्येही विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाची शक्यता आहे. अकोला, अमरावती, गोंदिया आणि नागपुरात विजांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे. यापार्श्वभूमीवर यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात हलक्या पावसाची सरी कोसळण्याची शक्यता आहे.