जळगाव : प्रतिनिधी
मराठा समाजातील महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा तत्कालीन पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले मोकाट फिरत आहे. त्यामुळे दहा दिवसाच्या आत बकालेला तात्काळ अटक करा अन्यथा दि. ४ डिसेंबर पासून पोलीस अधीक्षक कार्यालयासमसोर आमरण उपोषण करण्याचा इशारा छत्रपती शिवाजी बिग्रेडने दिला आहे.
मराठा समाजातील महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा तत्कालीन पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा व उच्च न्यायालयाने त्याला जामीन नाकारला असून पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या सहकार्याने तो मोकाट फिरत आहे. त्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन होत असून समाजात असंतोष निर्माण होत आहे.
गेल्या वर्षभरापासून बकालेला संरक्षण देणाऱ्या तपास अधिकाऱ्यांना तातडीने निलंबीत करावे. तसेच या गंभीर घटनेकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलीस अधीक्षकांची तातडीने बदली करावी. तसेच विशेष पोलीस महानिरीक्षकांची देखील याप्रकरणी सखोल चौकशी करावी, या मागणीसाठी दि. ४ डिसेंबर पासून पोलीस अधीक्षक कार्यालया समोर छत्रपती शिवाजी बिग्रेडचे संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे हे आमरण उपोषण करणार आहे. त्यांनी त्याबाबतच निवेदन पोलीस महासंचालक व गृहमंत्र्यांना दिले आहे. दहा दिवसाच्या आत अटक न झाल्यास जो पर्यंत त्याला अटक होत नाही, तो पर्यंत आमरण उपोषण करणार असल्याची माहिती छत्रपती शिवाजी बिग्रेडचे पदाधिकारी डॉ. गणेश पाटील यांनी दिली.